काखे येथे भव्य कृषी मेळावा संपन्न
काखे ता. पन्हाळा येथे डॉ. डी.वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे तर्फे ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत दिनांक 12 जानेवारी रोजी कृषी मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते जयवंत जगताप सर (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे) व प्रा. रणजीत पाटील ( सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय तळसंदे) यांनी अनुक्रमे ऊस उत्पादन तंत्रज्ञान व ऊस/भाजीपाला पिकातील किडी व त्यांचे व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डी. एन. शेलार सर ( प्राचार्य कृषी महाविद्यालय, तळसंदे) यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काखे गावच्या सरपंच सौ. राजश्री पाटील व कृषी सहाय्यक सौ. माधुरी पाटील लाभल्या. कृषी मेळाव्यामध्ये काखे व परिसरातील विविध गावातील असंख्य शेतकऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एम. घोलपे व रावे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कृषिदूत युवराज पाटील आणि आभार प्रदर्शन कृषिदूत अभिजीत जाधव याने केले.